जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज्याच्या मागण्या शनिवारी मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर मुंबईतील वाशीमध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या असल्या तरी ते युद्धात जिंकले, तहात हरले अशी टीका सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.
अशातच नारायण राणे यांनी एक ट्विट केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याचे राणे म्हणाले. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. नारायण राणे मराठा समाजाच्या अन्नात माती कालवायला बघत आहेत. तसेच सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा हरकती मागवल्या आहेत, तिथे आक्षेप नोंदवा असंही त्यांनी सुनावलं आहे.
काय म्हणाले होते नारायण राणे
मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईच्या दारात आल्यानंतर सरकारने तातडीने निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी कुणबी नोंदी मिळणार आहे. मात्र राज्य सरकारच्या निर्णयावर आपण सहमत नसल्याचे केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले होते. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजाचे खच्चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्याचे ट्विट नारायण राणे यांनी केलं होतं.
मराठ्यांच्या अन्नात माती कालवायला बघत आहेत : मनोज जरांगे पाटील
नारायण राणे यांच्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आपण बनवलेला कायदा किती मजबूत आहे हे समजून घेतले पाहिजे. ते एकटेच आहेत, जे मराठ्यांच्या अन्नात माती कालवायला बघत आहेत’, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा समाजाला आता आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे समाजात दुही दाखवू नका, असं देखील ते म्हणाले. एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही, हा माझा शब्द आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.