Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून ते आता आंदोलनास्थळावरून मुंबईमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा बांधव जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, फडणवीसांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची जरांगेंची भूमिका असून ते उपोषणस्थळ सोडून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. सध्या आंतरवाली सराटीमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीतील आंदोलन स्थळावरून निघून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नालेवाडी गावापर्यंत पोहोचले आहेत. सागर बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याच्या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत. दरम्यान, मुंबईच्या दिशेने निघाले असताना अशक्तपणामुळे जरांगे पाटील यांना भोवळ आली आहे. यामुळे येथे प्रचंड गदारोळ निर्माण झाला आहे.
मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट तसेच सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत .