जालना (आंतरवाली सराटी) : सग्या सोय-यांची अंमलबजावणी करावी, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या या उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची डॉक्टरांनी तपासणी केली आहे. यामध्ये त्यांचा बीपी आणि शुगर तपासला आहे. त्यामध्ये डॉक्टरांना त्यांचा बीपी खालावल्याचे दिसून आले. त्यांच्यावर उपचार घेण्यासाठी त्यांना सांगण्यात आले आहे. त्यावर जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मी उपचार घेणार नाही, असे जरांगे म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता संपल्यानंतर आठ जूनपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. यावेळी माध्यमांसोबत बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला आहे. इकडे आमरण उपोषण सुरु आहे. सरकार मुद्दाम डाव खेळत आहे. त्यांना माया असते तर त्यांनी दखल घेतली असती. जर सरकारने दखल घेतली नाही तर मराठे चांगला हिसका दाखवतील, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.