जालना : मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी गेल्या तीन दिवसापासून पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. तसेच, उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिल्यामुळे कालपासून त्यांची तब्येत खालावली आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईतकडे आपला मोर्चा वळवला होता. मात्र, वाशीमध्ये त्यांचे आंदोलन थांबवत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होता. तसेच १५ दिवसांत या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचं देखील आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, १५ दिवस उलटून गेल्यावर देखील या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे.