वाशी : चारित्र्याच्या संशयातून विवाहितेस बंदुकीची गोळी मारून ठार केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ही थरारक घटना वाशी शिवारात पिंपळगाव (लि.) रस्त्यावरील खैराड वस्तीवर शुक्रवारी (दि.६) सकाळी ८ वाजेच्या सुमारास निदर्शनास आली. गोळीबारात मयत झालेल्या महिलेचे नाव सोनाबाई दत्ता शिंदे (वय २५ रा. खैराड वस्ती वाशी जि. धाराशिव) असे आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाशी शिवारातील खैराड वस्तीवरील आदिवासी समाजाची महिला सोनाबाई दत्ता शिंदे (वय २५ वर्षे) यांचा पती दत्ता आबा शिंदे (वय २५ वर्षे) हा तिच्यावर चारित्र्याचा संशय घेत होता. त्याने याच कारणावरून शुक्रवारी (दि.६) सकाळी ८ वाजेच्या पूर्वी साडेतीन फूट लांबीच्या बंदुकीने गोळी झाडून तिचा खून केला.
या दुर्घटनेनंतर त्याने घटनास्थळावरून पलायन केले. मयताचा सासरा आबा मच्छिद्र शिंदे (वय ४९ वर्षे) याने दत्ता यास मदत केली. या प्रकरणी मयत महिलेचे वडील वसंत देवराव काळे (रा. पारा, ता. वाशी) यांनी वाशी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दत्ता शिंदे व आबा शिंदे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक गोहर हसन, भूमचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ, वाशीचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, सपोनि सावंत, रमेश धूले यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. प्रेत शवविच्छेदनासाठी वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.