किनगाव (लातूर) : चाकूर तालुक्यातील जढाळा येथील डोक्यावर परिणाम झालेल्या २९ वर्षीय मुलाला घरातील पलंगाला हात-पाय बांधून दोरीने गळा आवळून वडिलानेच त्याचा खून केल्याची घटना गुरुवारी (दि.२९ ऑगस्ट) सकाळी घडली. या घटनेची कुठेही वाच्यता न करता अंत्यविधी उरकण्याची तयारी सुरू होती. गावातील अज्ञाताने ११२ क्रमांकावर फोन केल्याने खून केल्याची घटना उघडकीस आली. मयत तरुणाचे नाव कृष्णा शिवाजी संगनगिरे (वय २९ रा. जढाळा ता. चाकूर जि. लातूर) असे आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आणि पोलिसांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २) दुपारी पित्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, चाकूर तालुक्यातील जढाळा येथील कृष्णा शिवाजी संगनगिरे (वय २९) या तरुणाच्या डोक्यावर दहा वर्षांपूर्वीपासून परिणाम झाला होता. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरू होते. कृष्णा हा गावातील नागरिकांच्या मोटारसायकली व इतर गाड्यांचे नुकसान करीत होता. त्याच्या या वागण्याला घरच्यांसह गावातील नागरिक वैतागले होते. घरातील मंडळी त्याला दवाखान्यासाठी घेऊन जात असताना नेहमीच तो भांडण करीत असे. गुरुवारी (दि.२९ ऑगस्ट) त्याचे आई-वडील हे मन्मथ स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी जाणार होते. यामुळे सकाळी स्वयंपाकाची घाई सुरूहोती. त्यावेळी मयत कृष्णा हा स्वयंपाक खोलीत गेला. त्याने आईसोबत जेवण देण्यासाठी भांडण सुरू केले.
साहित्याची आदळआपट केली. यामुळे त्याचे वडील शिवाजी विश्वनाथ संगनगिरे (वय ५३) यांनी त्याला भीती दाखवण्यासाठी काठीने मारत होते. काठी त्याच्या कपाळावर लागली. यात तो चक्कर येऊन फरशीवर पडला. तो शुध्दीवर आल्यावर पुन्हा मला ठार मारेल, या भीतीने वडिलांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत पलंगाला हात-पाय बांधून ठेवले. त्याच स्थितीत दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर वडिलांनी स्वतःच दोरी व इतर पुरावा नष्ट करून कृष्णाचा फरशीवर पडून मृत्यू झाल्याचा बनाव रचला. त्याचा मृत्यू झाल्याची घटना घरातील सर्वांना कळाली, बराच वेळ दुःख व्यक्त करत रडण्याचा आवाज ऐकून शेजारी जमा झाले. अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. अशातच ११२ नंबरवर कोणीतरी फोन केला. तेव्हा पोलिसांनी घटनेची शहानिशा करुन किनगाव पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली. मयत कृष्णाचे प्रेत शवविच्छेदनासाठी जानवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालावरून व प्रेताच्या गळ्यावरील दोरीचे वन, इतर जखमांवरून पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड यांच्या फिर्यादीवरून मयत कृष्णाचे वडील शिवाजी विश्वनाथ संगनगिरे यांच्या विरोधात सोमवारी (दि.२) दुपारी किनगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.