हिंगोली : तालुक्यातील बोराळा येथे सासुरवाडीला आलेल्या भाऊजीचा मेहुण्याने कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि.७) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी घावं घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. बहिणीला त्रास दिला जात असल्याने भाऊजीचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली.
हिंगोली येथील संतोष बबन सराफ यांचा मागील आठ वर्षांपूर्वी बोराळा येथे विवाह झाला होता. त्यांना दोन लहान मुले देखील आहेत. ६ मे रोजी रात्री संतोष हे बोराळा येथे सासुरवाडीला आले होते. यावेळी रात्रीच्या सुमारास त्यांचा पत्नीसोबत वाद झाला होता. यावेळी त्यांचे सासरे, मेहूणा बाळू किशन देशमुख तेथेच होते. बाळू याने बहिणीचे नेहमीच भांडण होत असल्याने मागचा पुढचा विचार न करता कुऱ्हाडीने भाऊजी संतोष सराफ यांच्या डोक्यात घाव घातले. त्यानंतर
त्यांच्या हातावर, पायावर कुन्हाडीचे घाव घातले. अतिरक्तस्त्राव होऊन संतोष यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड, जमादार आकाश पंडितकर, प्रदीप राठोड, शंकर इडोळे, संदीप जाधव, चिभडे यांच्या पथकाने रात्री एक वाजता घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळावर पोलिसांनी पाहणी केल्यानंतर मयत संतोष यांचा मेहुणा बाळू यास ताब्यात घेतले. त्यानंतर मयत संतोष यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला होता. पोलिसांनी बाळू याची अधिक चौकशी केली असता, बहिणीसोबत भांडण करीत असल्याने भाऊजी संतोष यांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांनी सागितले. अधिक तपास हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे संबंधित पोलीस अधिकारी करीत आहेत. न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.