परंडा : वडिलांवर असलेल्या रागाच्या कारणातून पोटच्या मुलाने जन्मदात्या वडिलांचा धारधार शस्त्राने वार करून खून करत मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. ही खळबळजनक घटना गुरुवारी (दि.८) रात्री भूम तालुक्यातील आंतरगाव शिवारात घडली असून हा गुन्हा दोन दिवसांनी उघडकीस आला आहे. त्यानंतर पोनि विनोद इज्जपवार व पथकाने शनिवारी (दि.१०) आरोपीला चार किलोमीटर पाठलाग करून मोठ्या धाडसाने अटक केले असून गुन्ह्यातील शस्रही पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १०) रोजी आंतरगावजवळील बाणगंगा नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती परंडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार जवळा दूरक्षेत्रचे पोलीस हवालदार घोळवे आणि पोलीस नाईक स्वामी यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्राबाहेर काढून पंचनामा केला. यावेळी त्यांना सदरील प्रेताच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे व हा मतदेह गावातीलच विक्रम निवृती गोरे (वय ५५) यांचा असल्याचे निदर्शनास आले.
यानुसार पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी हे चौकशी करण्यासाठी मयत विक्रम गोरे यांच्या घरी गेले असता त्यांचा मुलगा विजय उर्फ बोधीराम विक्रम गोरे (वय ३०) हा हातात लोखंडी शस्त्र घेवून पोलिसांच्या अंगावर धावून आला. याबाबतची माहीती शिवानंद स्वामी यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना माहिती दिली. त्यानुसार पोनि विनोद इज्जपचार, सपोनि शंकर सुर्वे हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी विजय मोरे हा पुन्हा धारधार शस्त्र घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून आला.
त्यामुळे पोलिस बळाचा वापर करून त्यास पकडण्यासाठी पुढे सरसावले असता आरोपीने तेथून पळ काढला. यानंतर तब्बल चार किलोमीटरपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करून पोलिसांनी आरोपी विजय गोरे यास ताब्यात घेतले. याप्रकरणी विक्रम गोरे यांच्या पत्नी राहिबाई विक्रम गोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मुलगा विजय याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सूर्वे, सपोउपनि गजानन मुळे, पोलीस कर्मचारी शिवानंद स्वामी, शिवकुमार घोळवे, गुंडाळे, मिसाळ, काकडे यांच्या पथकाने केली.
आरोपीने केला गुन्हा कबूल
सदरील आरोपीस पाठलाग करून ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी विश्वासात घेवून चौकशी केली. यावेळी आरोपी विजय विक्रम गोरे याने कौटुंबिक कारणातून आपणच वडिलांचा ८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास धारधार शस्त्राने वार करून खून करत मृतदेह नदीपात्रात फेकल्याचे सांगितले. तसेच गुन्ह्याचे घटनास्थळही दाखविले आणि खून करण्यासाठी वापरलेले हत्यारही त्याने काढून पोलिसांना दिले. हा सिनेस्टाईल प्रकार पहाण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.