जालना : वकील असलेल्या एका महिलेने ३१ वर्षीय प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरून खून केल. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाचेगाव (ता. नेवासा, जि. अहमदनगर) शिवारात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अंबादास भानुदास म्हस्के (वय ३५, रा. रमाबाईनगर, जुना जालना) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी नेवासा पोलिसांनी तब्बल १३ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मृताची ओळख पटवून संशयित वकील पत्नी व तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबादास भानुदास म्हस्के (रा. रमाबाईनगर, मोतीबागेजवळ, जालना) याचा मृतदेह १६ ऑगस्ट रोजी पाचेगाव शिवारातील मेडीकल कॉलेजजवळी शेतात रस्त्यालगत आढळून आला होता. त्याचा गळा धारदार शस्त्राने कापल्याचे खुना आढळून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते, त्यामुळे अज्ञात आरोपींविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक वैभव कुलबर्मे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, नेवासा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना तपास कामी सूचना केल्या. आजूबाजूची गावे, पोलीस ठाणे व नागरिकांना मृत व्यक्तीबाबत माहिती देऊन ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृताची ओळख पटत नसल्याने तो बाहेर जिल्ह्यातील असल्याची शक्यता गृहित धरून पथकाने मृताचे फोटो महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाणे व व्हॉटसअॅप ग्रुपवर पाठविले, तसेच नेवासा ते श्रीरामपूर रस्त्यावरील सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले.
यामध्ये एक रॅनॉल्ट ट्रिबर ही कार (एमएच २१, बीव्ही ५०९२) संशयितरित्या फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. पोलिसांनी सदर गाडीची माहिती काढली असता, ती अंबादास म्हस्के (रमा बाईनगर, जालना) याच्या नावावर असल्याची माहिती समोर आली. मात्र, अंबादास याचा रजिस्टर मोबाईल १५ दिवसांपासून बंद असल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याची पत्नी मीरा अंबादास म्हस्के (वय ३६, रा. रमाबाईनगर, जुना जालना) हिचा शोध घेतला असता; ती लोणी (ता.इंदापूर, जि. पुणे) येथे भाड्याने खोली घेऊन राहत असल्याची माहिती मिळाली. नेवासा पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी लोणी येथे मीरा म्हस्के हिचा शोध घेतला असता ती एका दुसऱ्या व्यक्तीसोबत असल्याचे आढळून आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन नेवास येथे आणले. चौकशीत संशयित व्यक्तीने आपले नाव लहू शिवाजी डमरे (वय ३१, रा. ढोकसाळ ता, बदनापूर, जि. जालना) असे सांगितले.
यावेळी लहू डमरे व मीरा म्हस्के यांचे प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. पती अंबादास हा आपणास वारंवार त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यास पुणे येथे कामानिमित्त जायचे आहे, असे सांगून गाडीत सोबत नेले. रात्रीच्यावेळी पाचेगाव शिवारात त्याचा गळा आवळून खून केला. पती मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यास गाडीतून खाली टाकत गळा कापून मृतदेह रस्त्यालगत फेकून दिल्याची कबुली दोघांनी दिली. संशयित वकील महिला मीरा म्हस्केसह तिचा प्रियकर लहू डमरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेवासा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.