अजिंठा : तालुक्यातील बाळापूर येथील पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास घडली. शॉक लागून ठार झालेल्या शेतकऱ्यांचे नाव दामोदर अशोक निंभोरे (४५ रा. बाळापूर ता. सिल्लोड) असे आहे. ते बाळापूर येथील गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष सुध्दा होते. याबाबत मिळालेल्या अधिक माहीतीनुसार, शेतकरी अशोक दामोदर निंभोरे हे सोमवारी (दि.१९) दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतात अद्रक पिकाला ड्रिचिंग करण्यासाठी गेले होते. त्यांनी मी रात्री शेतातच मुक्कामी थांबणार आहे, असे घरच्यांना सांगितले होते.
परंतु, सकाळपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शेतात जाऊन पाहिले असता ते विजेच्या ताराला स्पर्श होऊन जागीच बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना अजिंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंडेकर यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शवाविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी बाळापूर येथे शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात आई वडील, दोन मुली, एक मुलगा पत्नी असा परिवार आहे. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सपोनि अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ संतोष पाईकराव, समशेर तडवी करीत आहे.