छत्रपती संभाजीनगर: चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ३ ऑगस्टला रात्री साडेअकरा वाजता मिलींदनगर भागात हा प्रकार घडला. जावयाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या सासूवरही जावयाने चाकूने हल्ला करीत जखमी केले. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरुन आरोपी पतीविरुध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्नी निलम संतोष खरे (२३ रा. मिलींदनगर) हिने तक्रार दाखल केली.
३ ऑगस्टला रात्री निलम घरी असताना पती संतोष राजू खरे (रा. मिलींदनगर) हा घरी आला. आल्याबरोबर त्याने पत्नीला शिवीगाळ सुरु केली. पत्नीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपी संतोषने त्याच्या जवळील चाकूने निलमवर हल्ला चढवला. यामध्ये निलमच्या मांडीवर, डाव्या हातावर, उजव्या अंगठ्यावर चाकू लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानी घराबाहेर धाव घेत दिराकडे जाऊन जीव वाचवला. घाटीत उपचार घेतल्यानंतर त्या मिलींदनगर येथेच दिराच्या घरी थांबल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ४ ऑगस्टला संतोषला हा प्रकार समजल्यानंतर त्याने गोंधळ सुरु केला.
निलम यांची आई अलका राजू वारे या त्याला समजावण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी संतोषने त्यांच्यावर देखील चाकूहल्ला चढवला. यामध्ये पोटावर आणि छातीवर चाकूचा वार लागल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने जखमींना दिली. या प्रकरणी निलम यांच्या तक्रारीवरुन आरोपी संतोष खरे विरुध्द उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय शिवाजी चौरे पुढील तपास करीत आहे.