जालना : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर विहिरीच्या बांधकामाचे मस्टर (बिल) मंजूर करून देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कंत्राटी रोजगार सेवकास लाचलुचपत प्रतिबंधंक विभागाने मंगळवारी (दि.२८) रंगेहाथ पकडले. भाऊसाहेब काशीनाथ गिराम (वय ४८, रा. राममूर्ती, ता. जालना) असे लाच स्वीकारणाऱ्या रोजगार सेवकाचे नाव आहे.
तक्रारदार यांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिर मंजूर झाली असून, त्याचे काम सुरू आहे. तक्रारदार स्वतः जॉबकार्डधारक आहेत. विहिरीच्या कामाचे चालू १ महिन्याचे मस्टर घेण्यासाठी तक्रारदार रोजगार सेवक गिराम यास भेटले होते. या कामासाठी गिराम याने इंजिनिअर यांच्यासाठी दोन हजार व स्वतःसाठी ५०० रुपयांची लाच मागितली. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून जालना पंचायत समिती कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार यांच्याकडून अडीच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.