छत्रपती संभाजीनगर: हातात तलवार घेऊन फिरणाऱ्याला पुंडलिकनगर पोलिसांनी गजाआड केले. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी (दि.२७) ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश यादव यांनी दिली. गजानन अशोक पवार (३५, रा. बिबी, ता. लोणार, जि. बुलढाणा, ह.मु. बंबाटनगर) असे आरोपीचे नाव आहे. पुंडलिकनगर ठाण्यातील विशेष पथकाचे सहायक फौजदार सुनील म्हस्के, अंमलदार गणेश डोईफोडे, जालिंदर मान्टे, कल्याण निकम, दीपक जाधव, संदीप बीडकर, राजेश यदमळ, विक्रम खंडागळे, प्रशांत नरवडे आणि नंदा गरड यांचे पथक पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरात एकजण तलवार घेऊन फिरत असल्याची खबर पथकाला मिळाली. त्यांनी तत्काळ तिकडे धाव घेत रात्री संशयिताला पकडले. त्याच्याविरुद्ध सहायक फौजदार ल.ब. हिंगे यांच्या फिर्यादीवरुन पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.