नांदेड : बाबा मला मोबाईल हवाय, नवीन कपडे हवेत, शाळेचं साहित्यही संपलं आहे, कधी घेऊन द्याल? जवळपास प्रत्येक घरात मुलाकडून वडिलांकडे अशी मागणी केली जाते. मुलाचा हा आणि असे असंख्य हट्ट पूर्ण करण्यासाठी बाप घाम गाळतो, काबाड कष्ट करतो. एवढं सगळं करूनही काही वेळेला आर्थिक परिस्थितीमुळे बापाला मुलाचे हट्ट पूर्ण करणं शक्य होत नाही. बापाने असाच छोटासा हट्ट पूर्ण केला नाही, म्हणून मुलाने गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे मुलाने ज्या दोरखंडाने गळफास लावून घेतला, त्याच दोरखंडाने वडिलांनीही स्वतःला गळफास लावून घेतला आहे. ९ जानेवारीला नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात मिनकी येथे ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.
४३ वर्षांचे अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र पैलवार यांच्या शेतावर चार लाख रुपयांचे कर्ज होतं. कर्ज आणि सततची नापिकी यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना कठीण जात होते. राजेंद्र पैलवार यांचा १६ वर्षांचा मुलगा ओंकार पैलवार हा उदगीर येथे शिक्षणाला होता. मकर संक्रातीनिमित्त तो गावाला आला होता. गावाला आल्यानंतर ओंकारने वडिलांकडे नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य आणि नवीन मोबाईलसाठी पैसे मागितले. पण पैसे नाहीत, थोडे दिवस थांब नंतर देतो, असं वडिलांनी सांगितलं. त्यामुळे नाराज झालेल्या ओंकारने टोकाचं पाऊल उचललं. ओंकारने शेतातील झाडाला गळफास लावून जीवन संपवलं. मुलगा घरी न आल्यामुळे वडिलांनी शोधाशोध केली, तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन ओंकारने जीवन संपवल्याचं त्यांना दिसलं. हे पाहून हतबल झालेल्या वडिलांनी मुलान ज्या दोरखंडाने गळफास लावून घेतला, त्याच दोरखंडाने आणि त्याच झाडाला गळफास लावून घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपविली. या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद बिलोली पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
एकाच दोरीने घेतला गळफास
राजेंद्र पैलवार यांना केवळ दोन एकर शेती असून यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा खतगाव येथील बँकेचे ३ लाख ३३ हजार ४५६ रूपये कर्ज आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे आपण आपल्या मुलाला नवीन कपडे व शिक्षणासाठी उपयोगी पडणारा मोबाईल घेऊन देऊ शकलो नाही म्हणून आपल्या मुलाला आत्महत्या करावी लागली. या विवचनेतून राजेंद्र पैलवार यांनीही मुलाने गळफास घेतलेल्या दोरीनेच स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केली.