बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, महेश केदार आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मकोका कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. या गुन्ह्याचा तपास करत असलेल्या विशेष तपास पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी आणि सीआयडीकडून केला जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे सुतोवाच काही दिवासंपूर्वीच केले होते. त्यानुसार संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर या कायद्याअंतर्गत आता कारवाई होणार आहे.
संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी राज्यभरात मोर्चे निघत आहेत. सर्व आरोपींवर मकोकाअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण ८ जणांना या प्रकरणात अटक केली आहे, मात्र त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. दरम्यान, कृष्णा आंधळे हा आरोपी घटनेला महिना झाल्यानंतरही फरार आहे. या सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आल्याची माहिती एसआयटी पथकातील वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली.
मकोका म्हणजे काय ?
मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज्ड क्राईम अॅक्ट. सन १९९९ मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा कायदा करण्यात आला. संघटित गुन्हेगारीला आळा घालणे, हा कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. गुन्हेगारांच्या एखाद्या टोळीविरोधात किंवा टोळीच्या म्होरक्याविरोधात एकापेक्षा अधिक आरोपपत्र किंवा गुन्हे दाखल असतील तर अशा प्रकरणात मकोका लावता येतो.
यावेळी या टोळ्यांनी आपल्या गुन्ह्यांमधून आर्थिक लाभ घेतला आहे का? आदी गोष्टी तपासल्या जातात. मकोका लावण्यासाठी गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा असावा लागतो. १८० दिवसांपर्यंत पोलिसांना यामध्ये आरोपपत्र दाखल करता येते. मकोका लागल्यानंतर सहा महिन्यांपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही. मकोका गुन्ह्यात किमान पाच वर्षांची शिक्षा व पाच लाखांचा दंड होऊ शकतो. जास्तीत जास्त शिक्षा ही गुन्ह्याच्या स्वरूपावरून ठरत असते, असे सूत्रांनी सांगितले