Beed News : बीड शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत एका ५० वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे. शहरातील बार्शी नाका परिसरामध्ये शुक्रवारी २२ डिसेंबर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. मधुकर खंडेराव शिंगण असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीच नाव आहे.
दरम्यान, आज बीडमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे. मराठा समाजाला सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी ही सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून हजारो मराठा बांधव बीडच्या दिशेने रवाना झाले आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मधुकर शिंगण यांनी आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचं नाव घेत एक चिट्ठी लिहून आत्महत्या केली आहे.
मयत मधुकर शिंगण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली आहे, त्यामध्ये “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राम राम… मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत आहे. मनोज जरांगे पाटील हे चांगलं काम करत आहेत. त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, असा मजकूर चिठ्ठीमध्ये लिहिलेला आहे. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. सरकारने तातडीने आरक्षण जाहीर करावं, त्याचबरोबर शिंगण कुटुंबियांना सरकारी मदत जाहीर करावी, अन्यथा मोठं आंदोलन करू असा इशारा मराठा बांधवांनी दिला आहे.