परभणी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परभणीमधील एका कार्यक्रमात बाबाजानी दुर्रानी यांच्या मुलाने हजेरी लावली. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्याकडे पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवार मिळावी अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी (दि.25) अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतर जुनेद दुर्रानी यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, पक्षाने आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही स्वगृही परतण्यास तयार आहे. उद्या जर आम्हाला उमेदवारी नाही भेटली तर आमची अपक्ष लढवण्याची देखील तयारी आहे. मात्र, महायुतीतून निवडणूक लढवणार नाही. हे आमचं स्पष्ट आहे, असं बाबाजानी दुर्रानी यांचे पुत्र जुनेद दुर्रानी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्या भेटीवर बाबाजानी दुर्रानी म्हणाले, आमचे आणि जयंत पाटलांचे फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते घनसावंगीरुन परभणीला जात होते. त्यावेळी त्यांनी फोन केला की, मी चहा प्यायला येत आहे. मी म्हणालो, चहा नको जेवनच करा. जेवन करुन पुढे जावा. त्यानंतर ते म्हणाले मी संध्याकाळी जेवन करुन जातो. आमचे संबंध असल्याने मीडियामध्ये चर्चा होत असते. आमच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे संबंध आहेत. मी शरद पवार यांच्यासोबत 1985 पासून आहे, असं बाबाजानी दुर्रानी म्हणाले.