लातूर: लातूरध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरती परीक्षेत कॉपी पुरवल्याप्रकरणी, ‘टीसीएस’कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत ‘टीसीएस’च्याच एका कर्मचाऱ्याच्या जवळच्या नातलगांची नावे असल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते. त्यामुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये झालेला गोंधळ उजेडात आला होता. आता लातूर पोलिसांनी याचा तपास करून प्राथमिक तपासणी अहवाल सादर केला आहे. याच्या आधारे टीसीएस कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांकडून परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘एमपीएससी’मार्फत परीक्षा घेण्याची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी केलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण उजेडात आले आहे. तलाठी भरतीमध्येही लातूर येथील परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाला दिलेल्या निवेदनात केला होता. या प्रकारांमुळे संपूर्ण नोकरभरती प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सर्व परीक्षा ‘एमपीएससी’मार्फत व्हाव्यात, अशी मागणी होत आहे.