नांदेड : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होताच कागदपत्राची जुळवाजुळव करण्यासाठी बहीणींना खूप आटापिटा करावा लागला. अनेकांच्या खात्यात तीन हप्त्याचे पैसेही जमा झाले आहे. पण दुसरीकडे मनाठा येथे आधार कार्डवर खाडाखोड करुन लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करुन सदर रक्कम सीएससी केंद्र चालकाने परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार मनाठा (ता. हदगाव) येथे उघडकीस आला आहे.
नांदेडच्या हदगावमध्ये घडलेल्या या अपहारानं पोलीस प्रशासन चक्रावून गेलं आहे. लाखोंचा घोटाळा करुन लाडक्या बहिणींसोबत त्यांच्या पतींची फसवणूक करणारा सीएससी सेंटर चालक पसार झाला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
सचिन मल्टीसर्व्हिसेस अँड झेरॉक्स सेंटर चालकानं रोजगार हमी योजनेतील विहिरींचे पैसे आले असल्याचं सांगून त्याच्या ओळखीच्या पुरुषांकडून आधार कार्ड, बँक पासबुक अशी कागदपत्रं गोळा केली. लाडकी बहिणसाठी अर्ज करताना त्यानं महिलांच्या आधार कार्डचे नंबर टाकण्याऐवजी पुरुषांचे आधार कार्ड नंबर टाकले. त्यांचे बँक खाते क्रमांकही दिला. पैसे खात्यात जमा होताच, रोजगार हमी योजनेचे पैसे आल्याचं सांगून संबंधित पुरुषांचे अंगठे घेऊन जमा झालेली रक्कम काढली. अशी माहिती समोर आली आहे.
असा उघडकीस आला प्रकार…
मनाठा येथील अलीम सलीम कादरी यांच्या मोबाईलवर लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा झालेलं मेसेज आला. त्यामुळे घोटाळा उघडकीस आला. मनाठा गावातील 38, तर बामणी फाटा येथील 33 पुरुषांचे आधार क्रमांक वापरुन तब्बल 3 लाख 19 हजार 500 रुपये काढण्यात आले. ही रक्कम घेऊन केंद्रचालक फरार झाला आहे. ज्या अलीम कादरी यांच्या मोबाईलवर मेसेज आला त्याने लगेच सेंटर चालकाला विचारपूस केली असता तेव्हा सेंटर चालकाने कोणाला सांगू नको, काही होत नाही असे सांगितले. तुमची कागदपत्रं परत करतो, असं सांगून तो सेंटरला कुलूप लावून सेंटर चालक पसार झाला आहे.
या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोणत्याही योजनेची रक्कम अशा प्रकारे उचलणं गुन्हा आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांची नावं कशी घेतली गेली? यात कोणाकोणाचा सहभाग ते चौकशीतून समोर येईल. दोषींसह संबंधित केंद्र चालकांवर कायदेशीररित्या गुन्हादेखील दाखल करण्यात येईल.
– अभिजीत राऊत- जिल्हाधिकारी, नांदेड