नांदेड: रस्त्याच्या कामाचे धकीत बिल मिळावे, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या कंत्राटदारासह कुटुंबास अज्ञात आरोपीकडून रविवारी (दि. १२) मध्यरात्री जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. यात साहित्य जळाले, सुदैवाने उपोषण करणाऱ्याला जाग आल्याने या कुंटुबाचा जीव वाचला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परभणी जिल्ह्यात ताडकळस ते धानोरा काळे पालम या ८.५ किमीचे बीबीए डांबरीकरणाचे काम माळयटा येथील कंत्राटदार राजू चुन्नपा हुलगुंडे यांनी केले होते. हे काम पूर्ण करून अनेक वर्षे उलटले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नांदेड यांच्याकडून कामाचे बिल मिळाले नाही. या संदर्भात अनेकवेळा पाठपुरावा केला. निवेदने दिली. परंतू, उपयोग झाला नाही. यामुळे थेट मुंबई येथे उपोषण केले. यानंतर बांधकाम विभागास बिल अदा करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावरून देण्यात आले. परंतु, बिल मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा नांदेड येथे उपोषण करण्याचे निवेदन दिले असल्याचे उपोषणकर्ते हुलगुंडे यांनी सांगितले.
या निवेदनानुसार ३० डिसेंबरपासून हुलगुंडे यांनी काही संघटनाच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर कुंटुंबासोबत उपोषण सुरू केले. या उपोषणात पत्नीसह लहान मुले उपोषणात सहभागी झाले आहेत. तरीही अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली नाही. उलट सा. बा. कार्यालयाच्या प्रवेशव्दारालगत सुरू असलेल्या उपोषणस्थळी
हुलगुंडे कुटुंब रविवारी रात्री झोपले असता मध्यरात्री अज्ञात आरोपींनी त्यांचे अंथरूण, पांघरून पेटवून देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात साहित्य जळाले. परंतु, आगीची झळ लागल्याने मला जाग आली आणि थोडक्यात वाचलो, असे उपोषणकर्ते राजू हुलगुंडे यांनी यावेळी सांगीतले.
यापूर्वी मी याच मागणीसाठी उपोषण सुरु केले होते. तेव्हा ४ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास काही जणांनी जबर मारहाण केली होती. या प्रकरणी आठ जणांविरूद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता उपोषणकर्त्या कुटुंबास जीवंत जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी सकाळी घटनास्थळी भेट दिली.