वसमत : तालुक्यातील गुंज गावातील मजूर ट्रॅक्टरमध्ये शेतात हळद काढण्यासाठी नांदेड जिल्ह्यात आलेगाव शिवारात जात असताना ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गुंज गावातील सात महिलांना पाण्यात जलसमाधी मिळून मृत्युमुखी पडल्या. त्यातील आपली आई गमावलेल्या कृष्णा राऊत या चिमुकल्याने घटनास्थळावर आर्त टाहो फोडला.
या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. सदरील चिमुकला घटनास्थळावरती धाय मोकळून रडत होता. ‘सरकार मला तुमचे पैसे नको, मला माझी आई मिळेल का? आता मी माय कोणाला म्हणू, माझी आई गेली आहे. मला डॉक्टर होवून आईची सेवा करायची होती. माझी आई परत येणार नाही. तुमच्या पैशाचे काय करू…? असे म्हणून आर्त टाहो फोडत कृष्णा राजू राऊत (वय १०) धाय मोकलून रडत होता. हा प्रसंग उपस्थित हजारो जनसमुदायाच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता. वसमत तालुक्यातील गुंज गावावर शोककळा पसरली आसून संपूर्ण जिल्हाभर आणि महाराष्ट्रभर सोशल मीडियावर मोठ्या संख्येने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. अत्यंत दुःखद अशा घटनेच्या पार्श्वभूमीवर वसमत तालुक्यातील गुंज गावावर शोककळा पसरली होती. ‘मयत सर्व महिलांचे शवविच्छेदन नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात करण्यात येऊन रात्री उशिरा गुंज गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.