बीड : शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मेटे यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते-पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.
ज्योती मेटे सध्या शिवसंग्राम संघटेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देत शिवसंग्राम संघटनेचे काम पुढे घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला. सध्या मेटे बीड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी दोनच दिवसांपूर्वीच त्यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेटही घेतली होती.
त्यानंतर रविवारी त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे; परंतु मेटे ज्या बीडच्या जागेवरून लढण्याची तयारी करत आहेत. सध्या त्या जागेवर शरद पवार पक्षाचे संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे मेटे यांना या जागेवरून तिकीट मिळणार का? ते पाहावे लागणार आहे.