बीड : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ज्योती मेटे यांनी त्यांच्या अप्पर सहनिबंधक पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची अधिकृत भूमिका त्यांनी आज स्पष्ट केले आहे. याबाबत आपण लवकरच आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्या विरोधात ज्योती मेटे लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झाले आहे. दरम्यान, महविकास आघाडीच्या माध्यमातून बीड लोकसभा निवडणुकीसाठी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मात्र, ज्योती मेटे महविकास आघाडीकडून निवडणूक लढतील की अपक्ष लढतील हे गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची दोन वेळा निवडणुकीसंदर्भात भेट देखील घेतली आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या ज्योती मेटे याच उमेदवार असतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत शरद पवार यांनी त्यांचा निर्णय जाहीर केलेला नसला तरी ज्योती मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढवण्याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे.
ज्योती मेटे यांनी आज शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीवरून चर्चा करण्यात आली आहे. तसेच कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा अपक्ष उमेदवारी दाखल करायची याबाबत दोन दिवसात ज्योती मेटे निर्णय घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी आपण ठाम असल्याचे ज्योती मेटे यांनी यावेळी सांगितलं आहे.