बार्शी : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बार्शी आगाराच्या धावत्या बसचा जॉईंट रस्त्यावर तुटल्याची घटना घडली आहे, या बसमध्ये साठ नागरिक प्रवास करत होते, मात्र या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ याचाच प्रत्यय बार्शी-धाराशिव मार्गावर बसमध्ये प्रवास करणाऱ्या ६० प्रवाशांना आला आहे.
याबाबत प्रवाशांकडून प्राप्त माहिती अशी की, बार्शी आगाराची एमएच १४ बीटी ३२४२ ही बस बार्शीहून धाराशिव येथे गेली होती. साडेचार वाजता ही बस साठ प्रवासी घेऊन बार्शीच्या दिशेने येत असताना बार्शी तालुक्यातील शेलगाव (मा) गावाजवळ आली असता अचानक बसचा जॉईंट तुटला. त्यामुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. दरम्यान, नादुरुस्त बसमधून आम्ही जीव मुठीत धरुनच प्रवास करत होतो. शेलगावपासून काही अंतरावर आल्यावर अचानक आम्हाला मोठा धक्का बसला, असं बसमधील प्रवाशांनी सांगितल.
बसमध्ये महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं प्रवास करत होते. या घटनेनंतर बसमधील प्रवाशांना पुढील प्रवास करण्यासाठी तब्बल पाऊण तास ताटकळत बसावे लागले. काही प्रवाशांनी खासगी वाहनाचा आधार घेऊन पुढील प्रवास केला. या घटनेमुळे प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं असल्याचा नागरिकांकडून सूर निघत आहे.