छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असताना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. सरकारच्या वतीने लाड यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

जातपडताळणी समितीने मराठा समाजातील 4 प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या मुद्द्यावरही प्रसाद लाड यांनी भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणी आपण स्वतः संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली असून जातपडताळणी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या विषयाशी संबंधित प्रकरणे मागे घेण्यासाठी मुख्य सरकारी वकिलांना निर्देश देण्यात आल्याची माहितीही लाड यांनी दिली.

वंशावळ समितीला आणखी 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून जातपडताळणीची प्रक्रिया जलद करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीबाबतही पुढील 90 दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सातारा आणि कोल्हापूर गॅझेटसंदर्भातील मागणीवर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सरकारने सर्व मागण्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपोषणादरम्यान तब्येत खालावू नये म्हणून जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्या विनंतीवरून उपचार घेतले. डॉक्टरांनी त्यांना सलाईन लावले. आणि पाणीपण पिले, दरम्यान, पाणी घेत असलो तरी उपोषण मागे घेणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता सरकार पुढील काही दिवसांत या मागण्यांवर कोणती पावले उचलते, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.







