उरुळी कांचन, (पुणे) : दुष्काळग्रस्त परिस्थितीची गंभीर दखल घेत दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे शनिवारी (ता. 03) नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. दुष्काळ ट्रिगर-1 लागू झाल्यानंतर नुकसानग्रस्त खरीप पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे.

‘अल निनो’च्या भीषण प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत शासनाने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात ‘ट्रिगर 1’ (प्रथम कळ) लागू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील बोरीभडक येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करत पंचनाम्याची मोहीम हाती घेतली आहे.
दौंड तालुक्यात यंदा पावसाने दांडी मारल्यामुळे विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी कमालीची खाली गेली आहे. परिणामी, बोरीभडकसह परिसरातील गावांमधील हातात आलेली पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत. शेतातील पिके जळाल्याने बळीराजाचे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे उघड्यावर पडला आहे.

बोरीभडक येथील बाधित शेतकऱ्यांच्या जळालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पाहणी व पंचनाम्याप्रसंगी कृषी सहाय्यक अधिकारी शैलेश मोरे, ग्राममहसूल अधिकारी (तलाठी) रामेश्वर वेताळ, ग्रामविकास अधिकारी विशाखा लेंडघर आणि सरपंच कविता कोळपे प्रत्यक्ष उपस्थित होत्या. अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची वस्तुस्थिती नोंदवून घेतली असून, एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीने पंचनाम्याची नोंद केली जात आहे.








