लातूर : लातूर येथील ऑयकॉन हॉस्पीटलचे संचालक डॉ. प्रमोद घुगे व त्यांचा नातेवाईक अनिकेत मुंडे याने आयकॉन हॉस्पीटलचे सेक्युरिटी सुपरवायझरला बेदम मारहाण करत त्यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. बाळू डोंगरे (वय-३६) असं खून करण्यात आलेल्या सुपरवायझरचे नाव आहे. याप्रकरणी लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात डॉ. प्रमोद घुगे आणि अनिकेत मुंडे यांच्यावर शुक्रवारी (दि. १३) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार आहेत.
बाळू डोंगरे हे ऑयकॉन हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. गुरुवारी सकाळी बाळू यांच्या परिवारास तो गंभीर असल्याचे कळवले गेले, ते हॉस्पिटलमध्ये गेले असता त्यांना बाळूस भेटू देण्यात आले नाही. उलट त्यांच्यावर दबाव टाकत त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर बाळू मृतावस्थेत आढळला. याबाबत डॉक्टारांना विचारले असता बाळू रुग्णालयात स्वतःच अपघातात तो जखमी झाला होता असे त्यांनी सांगितल्याचे बाळू यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
शुक्रवारी मृतदेह उत्तरीय तपासनीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले. त्यावेळी डॉ. प्रमोद घुगे यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. मयत बाळू यांच्या आईने हा खून असल्याचे सांगत तो डॉ. प्रमोद घुगे यांनी केल्याचे सांगितले. बाळू यांच्या पत्नींनीही असाच आरोप केला. शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. तणावही निर्माण झाला होता. पोलिसांनी अखेर डॉ. प्रमोद घुगे व अनिकेत मुंडे यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दिलीप सागर हे करित आहेत. डॉ. प्रमोद घुगे हे वादग्रस्त आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे.
डॉ. प्रमोद घुगे यांच्या शोधासाठी पथक रवाना
दरम्यान, आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद घुगे आणि त्यांचे सहकारी अनिकेत मुंडे सद्या फरार आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याची पी.आय दिलीप सागर यांनी दिली आहे.