बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्य ढवळून निघालं आहे. अशातच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत भर पडली आहे. आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला आहे. आता यानंतर वाल्मिक कराडला एसआयटीकडून ताब्यात घेण्याच बोललं जात आहे.
संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आज वाल्मिक कराडला कोर्टात आणण्यात आले. या प्रकरणात सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. सरकारी वकिलाने म्हटलं की, ‘आम्हाला वाल्मिक कराडचा हत्येत सहभाग तपासायचा आहे. त्यामुळे त्याची १० दिवसांची सीआयडी कोठडी द्या. वाल्मिक कराड याचे तपास अधिकाऱ्यांनी व्हाईस सॅम्पल घेतले आहेत. देशाबाहेर आणि देशात मालमत्ता जमवली आहे का? याचा तपासही करायचा आहे. ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचा आहे, त्यामुळे दहा दिवसांची कोठडी द्या. हत्यात सहभाग आहे का नाही ? याचाही तपास करायचा आहे.’
आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद..
आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, ‘सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दया. सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का? पंधरा दिवसात यांनी काय तपासले? घुले ,कराड दोन्ही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली गेली नाही? कराड तपासाला सहकार्य करत आहेत, मग आणखी पोलीस कोठडी कशासाठी? आता आणखी कोणता तपास करायचा राहिला आहे?’ असे प्रश्न कराडच्या वकिलांकडून कोर्टात विचारण्यात आले आहेत .
बँक खात्याचे चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान आहे. आरोपीच्या चौकशीची गरज नाही. याआधी वाल्मीक कराड याची 14 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. आता आरोपीला पोलीस कोठडीची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘पंधरा दिवसाची पोलीस कोठडी पुरेशी आहे. सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. व्हॉइस सॅम्पल घेतले आहेत. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडी द्या, असे आरोपीच्या वकिलांनी म्हटलं. तर इतर कोणाच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे का? याचा देखील तपास करायचा आहे, असे सरकारी वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला आहे.