बीड जिल्ह्यातील वडवणी येथील स्थानिक न्यायालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी वकील असलेल्या एका व्यक्तीने न्यायालयाच्या आवारातच गळफास घेऊनआत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत वकील हे बीडच्या वडवणी स्थानिक न्यायालयात कार्यरत होते. त्यांचं नाव वकील विनायक चंडेल असं आहे. त्यांनी न्यायालयाच्या खिडकीला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवला.

आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, वैयक्तिक किंवा व्यावसायिक तणाव असू शकतो, अशी चर्चा सुरु आहे. पोलीस घटनस्थळी सुसाइड नोट ठेवली आहे का? याचा तपास करत असून, मृत वकिलाच्या सहकाऱ्यांचे आणि कुटुंबीयांचे जबाब नोंदवले जात आहेत. ही घटना न्यायालयीन कामकाजादरम्यान घडल्याने वकिलांच्या समुदायात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सरकारी वकिलाने अशा प्रकारे न्यायालय परिसरातच जीवन संपवण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.







