छत्रपती संभाजीनगर : डासांच्या चाव्याद्वारे पसरणाऱ्या आजारांचे रूग्ण शहरांमध्ये वाढीस लागले आहेत. झिका विषाणू, वेस्ट नाईल विषाणू, चिकुनगुनिया, डेंग्यू आणि मलेरिया असे आजार मानवांमध्ये प्रसारित होतात. जगभरात दरवर्षी मच्छरजन्य रोगांपासून ७ लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू होतो. अनेकदा मच्छर सहज चावून जातात; मात्र, हा मच्छर कोणता होता, याची सामान्य माणसाला माहिती नसते. यामुळेच अनेकदा डासांमुळे होणाऱ्या आजारांचे लवकर निदान होत नाही.
परंतु आता काळजीचे कारण नाही. कारण तुम्हाला चावलेला मच्छर नेमका कोणत्या प्रजातीचा होता, याचा शोध घेतला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एका तरुणीने याबाबत संशोधन करून, एक मॉड्यूल विकसित केले आहे. या संशोधनाचे पेटंट प्रकाशित झाले आहे. या संशोधनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास मोठी क्रांती होणार आहे.
डॉ. आयेशा सिद्दीकी असे या संशोधक तरुणीचे नाव आहे. डॉ. आयेशा सिद्दीकी यांनी एक संवेदक सापळा बनवला आहे. या सापळ्याच्या माध्यमातून १० वेगवेगळ्या डासांच्या प्रजाती संगणक तंत्रज्ञानाच्या मदतीने ओळखल्या जाऊ शकतात. विशेष म्हणजे तयार केलेला संवेदक सापळा डासांच्या प्रजाती ओळखण्यास सक्षम आहे. ज्यामध्ये कॅमेरा, मायक्रो लेन्सचा, सेन्सरच्या मदतीने डासांची प्रजाती ओळखली जाऊ शकते.
मच्छरांपासून होणारे डेंग्यूसदृश्य आजार अनेकदा जीवावर बेतल्याचे चित्र आहे. आजार झाल्यावर रक्ताची तपासणी करून कोणता आजार झाला याचे निकष काढले जातात. या प्रक्रीयेला बराच वेळ जातो. पण आता तुम्हाला चावलेला मच्छर कोणता होता याची माहिती लगेच मिळणार असल्याने, होणाऱ्या रोगांबाबत डॉक्टरांना तत्काळ उपचार करणे शक्य होणार आहे. या नवीन संशोधनाचा मोठा फायदा होणार आहे.
डासांच्या प्रजाती ओळखण्यासाठी तयार केलेल्या मॉड्यूलचा उपयोग कीटकशास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, व्हेक्टर कंट्रोल एजन्सी यांच्या मदतीने केला जाणार आहे. या संशोधनाला पेटंट मिळण्यासाठीचा प्रस्ताव दाखल करण्यात आला असून, त्यानुसार हे संशोधन पेटंट कार्यालयाने प्रकाशित केले आहे. आता फक्त कन्फर्मेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
-डॉ. आयेशा सिद्दीकी, संशोधक