छत्रपती संभाजनगर : छत्रपती संभाजनगर येथे एका महिला डॉक्टरने आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे असं या डॉक्टर महिलेचे नाव आहे. लग्न झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यातच या पत्नीने आपलं जीवन संपवलं आहे.
दरम्यान, प्रतीक्षाने सुसाइड नोट लिहून आपलं आयुष्य संपवलं आहे. ही सुसाइड नोट डोळ्यात टचकन पाणी आणणारी तर आहेच मात्र चार महिन्यात तिला झालेला त्रास किती भयंकर आहे. हे वाचून अंगावर काटा आणणारा आहे. प्रतिक्षाने या सुसाईड नोटमध्ये डॉक्टर नवऱ्यावर असलेलं प्रेम मात्र त्याची किंमत न ठेवता त्याने केलेला तिचा छळ, तसेच आई वडिलांची काळजी अशा सर्व गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत.
गोड आहात दिसायला, गोडच रहा…. आणि कधी थोडं पण प्रेम केलं असेल तर मला टाईट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा… असंही प्रतिक्षाने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
डोळ्यात टचकन पाणी आणणारी सुसाइड नोट?
डिअर अहो, खूप प्रेम केलं तुमच्यावर, स्वत:ला विसरुन गेले. तुम्ही माझ्यासारख्या हसत्याखेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं. तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडंट बनवलं. खूप स्वप्न घेऊन तुमच्याशी लग्न केलं होतं. तुम्ही मला खूप जीव लावाल, काळजी घ्याल. करिअरमध्ये सपोर्ट कराल. आपली छोटीशी फॅमिली असेल. तुम्हाला मुलगा लागत होता ना त्याचीच तयारी करत होते मी. गोंडस बाळ असतं आपलं. पण आज ही वेळ आणलीय तुम्ही माझ्यावर,
तसेच, त्याच्या सांगण्यावरुन मित्र-मैत्रिणी काय नातेवाईक आणि घरच्यांशी बोलणं देखील सोडलं, तुम्ही जे सांगितलं ते सर्व केलं, पण तरी तुम्ही सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेत राहिलात, पण मी फक्त तुमच्याशी प्रामाणिक होते, असंही ती म्हणाली. तसेच, यामध्ये तिने आपल्या आई-वडिलांची आणि भावाची माफीही मागितली आहे. पण, मला असं जगावं वाटत नाही, असं ती म्हणाली.
याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवतेय. गोड आहात दिसायला, गोडच रहा…. आणि कधी थोडं पण प्रेम केलं असेल तर मला टाईट हग करुनच चितेवर ठेवा. बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा.
तुमचीच, प्रतीक्षा