बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य ढवळून निघालं आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना अटक झाली आहे. या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जात आहे. मात्र खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आलेली नाही. खंडणी प्रकरणातूनच माझ्या भावाचा खून झालेला आहे.अशावेळी वाल्मीक कराड याला 302 च्या गुन्ह्यात आरोपी करावं आणि त्यालाही मोक्का लावण्यात यावा, अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केली आहे.
आरोपी सुटले तर उद्या माझाही खून करतील..
हे आरोपी सुटले तर उद्या माझाही खून करतील, मग कुटुंबासाठी न्याय मागणारा कोणीही राहणार नाही. त्यामुळे उद्या सकाळी मोबाईल टाॅवरवर चढून मी स्वतःला संपवतो, असा इशारा संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला, पण आम्हाला तपासाची कुठलीही माहिती देण्यात येत नाही, आम्हाला या तपासापासून दूर ठवले जात आहे.
मोक्का वाल्मीक कराडवर का नाही?
सगळ्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला असताना वाल्मीक कराडवर का नाही? खंडणी प्रकरणातूनच माझ्या भावाचा खून करण्यात आला आहे. खंडणी मागायलाच आरोपी गेले होते. हे आरोपी जर सुटले तर ते मलाही मारून टाकतील. जे माझ्या भावाचे झाले तेच माझे सुद्धा होईल, अशी भिती धनंजय देशमुख यांच्याकडून माध्यमांशी बोलतांना व्यक्त करण्यात आली आहे.
धनंजय देशमुख पुढे म्हणाले की, उद्या मी माझ्या कुटुंबासह मस्साजोग मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे. आम्हाला न्याय मिळणार नसले तर मी स्वतःला संपवून घेतो. काय तपास सुरू आहे, कोणाला मदत करण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, माझ्या कुटुंबाला तपासाची माहिती का दिली जात नाही? असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. टॉवरवर चढून मी स्वतःला संपवून घेणार असल्याचे धनंजय देशमुख म्हणाले.
मला या सगळ्यांपासून भीती आहे..
मला या सगळ्यांपासून भीती आहे. खंडणीतल्या आरोपीला वेगळी आणि खुनाच्या प्रकरणातील आरोपींवर वेगळी कारवाई करण्यात येत आहे. यंत्रणा आम्हाला माहिती देत नाही, मुख्यमंत्र्यांना भेटून मी मागणी केली होती, पण तरी सुद्धा यंत्रणा आम्हाला तपासाची माहिती देत नाही. आरोपी सुटले तर हे आरोपी माझा खून करतील. खंडणी ते खून प्रकरण एकमेकाशी जोडलेले असून हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे. मला आणि कुटुंबाला जर न्याय भेटत नसेल मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा राहील, अशी उद्विग्न प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
.