छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्ग हा सातत्याने वेगवेगळ्या अपघातांमुळे चर्चेत असतो. शुक्रवारी ९ मार्चला मध्यरात्री समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर भरधाव वेगाने येणारी स्विफ्ट डिझायर गाडीची जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर, अन्य दोन गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर येथे घडली.
या भीषण अपघातात राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तसेच भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (३५) यांच्यासह संदीप साखरवाडे (४०) यांचा मृत्यू झाला. तर, रितेश भानादकर (२४) आणि आशिष सरवदे (३७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा येथील हे पदाधिकारी मुंबईला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला आहे.