छत्रपती संभाजीनगर: पुन्हा एकदा शहरातील पेट्रोल पंपावर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. 10 जानेवारीपासून पुन्हा एकदा राज्यातील ट्रक चालक संपावर जाणार असल्याची अफवा पसरली असून, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी चालक आपल्या गाड्यांचे टॅंक फुल करून घेत आहेत. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर आता मोठी गर्दी होत आहे. मात्र, अद्याप तरी आपल्याला ट्रक चालकांकडून संपाबाबत कुठलीही सूचना मिळाली नसल्याचं पेट्रोल पंप असोसिएशनचे अखिल अब्बास यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गर्दी करू नयेत असे देखील त्यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहेत.
सामोवारी सकाळपासून सोशल मीडियावर एक फोटो आणि दोन ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामधील एक ऑडिओ क्लिपमधील दोन लोकांचे संभाषण असून, त्यात 10 जानेवारीपासून पुन्हा एकदा संपावर जाण्याचा दावा करण्यात आला आहे. नवीन वाहन कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत हा संप सुरु राहणार असल्याचा यात उल्लेख आहे. याच ऑडीओ क्लिपमुळे नागरिक पुन्हा एकदा पेट्रोल डीझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर एकच गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे ही ऑडिओ क्लिप कधीची आहे, कुणाची आहे, त्यात कितपत तथ्य आहे, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ट्रक चालक पुन्हा संपावर जात असल्याच्या अफवांमुळे नागरिक पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे.