छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच मुलीनेही आपलं आयुष्य संपवल्याची दुःखद घडल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे ही घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आई आणि बहिणीच्या निधनाची बातमी समजताच गावी निघालेल्या मुलाचाही वाटेत भीषण अपघात झाला असून त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. माय-लेकीच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगावमध्ये आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कळताच मुलीनेही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वंदना भरत दुधारे आणि पल्लवी भरत दुधारे असे या मायलेकींचे नाव आहे. या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
आईचा मृतदेह दिसला आणि तिनेही..
दुधारे कुटुंब हे गेल्या अनेक दिवसांपासून शेतात राहत होते. काल रात्री रात्री सर्व कामे आटपून मुलगी पल्लवीने तिच्या आईच्या हातावर मेहंदी काढली आणि सर्वजण झोपी गेले. सकाळी उठल्यावर पल्लवीला तिची आई न दिसून आल्याने तिने आसपास शोध घेतला. यावेळी नजिकच्याच विहिरीत तिला आईचा मृतदेह आढळून आला. आईने आत्महत्या केल्याचा धक्का लेकीला सहन झाला नाही आणि तिने कोणताही विचार न करता स्वतःही विहिरीत उडी मारत आत्महत्या केली आहे.
आई आणि बहिणीच्या निधनाची बातमी मिळताच भाऊ वाल्मिक जनराव त्यांच्या पत्नीला घेऊन अंत्यविधीसाठी निघाले होते. मात्र मध्येच त्यांचाही अपघात झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह, पोलिसांनी धाव घेत दोघींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. माय-लेकीच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.