छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गरम वरणाच्या पातेल्यात पडून ३ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये ही घटना घडली आहे. चुलत बहिणीच्या वाढदिवसाला गेले असता या चिमुकल्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वंश योगेश हरकळ (३ वर्षे) असं या मृत मुलाचे नाव आहे. वंश छत्रपती संभाजीनगरातील वाळूज परिसरात चुलत बहिणीच्या वाढदिवसाला गेला होता. वाढदिवसानिमित्त तयार केलेल्या उकळत्या वरणाच्या पातेल्यात पडून वंशचा मृत्यू झाला. वंशच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
पलंगाजवळ ठेवलेल्या गरम वरणाच्या पातेल्यावर पाय ठेवून वंश पलंगावर चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी वरणावरील झाकण सरकून वंश पातेल्यात पडला. वरण गरम असल्यामुळे तो या घटनेमुळे गंभीर जखमी झाला होता. वंशला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.