परभणी : परभणी जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये आज (२८ नोव्हेंबर) शिक्षक असलेल्या आई, वडील व मुलगी अशा तिघांनी रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारच्या वेळी घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे गोदा काठ हादरला असून आत्महत्येचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नी व मुलीसह गंगाखेड रेल्वे स्टेशनपासून परभणीकडे जवळच जाणाऱ्या लोहमार्गावर गोदावरी नदी पुलाच्या पुढे रेल्वे रुळावर डोकं ठेवून झोपत कोळसा वाहतूक करणाऱ्या माल वाहतूक रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण गोदाकाठाला हादरा बसला असून माल वाहतूक रेल्वेसमोर रेल्वे रुळावर डोकं ठेवून आत्महत्या केल्याच्या वृत्ताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव मसनाजी सुभाष तुडमे (वय ४५ वर्ष), त्यांची पत्नी रंजना मसनाजी तुडमे (वय ४० वर्ष) व मुलगी अंजली मसनाजी तुडमे (वय २१ वर्ष) असं आहे. विशेष म्हणजे एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगी या तिघांनी एका विचाराने एकाच रेल्वे रुळावर डोकं ठेवून आजुबाजूला एका रांगेत झोपून आत्महत्या केल्याच्या घटनेने या कुटुंबावर असे कोणते संकट कोसळले होते? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.