धाराशिव: राज्यातील व्यसनाधीनता कमी करण्यासाठी विविध शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्थांकडून मोठ्या [प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आता तरुणाईला दारुच्या व्यवसनापासून दूर करण्यासाठी बिअर बार, परमिट रुमवर फलक लावण्याची सूचना राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे. ‘आरोग्य तरुणांईचे, वैभव महाराष्ट्राचे’ असे बोर्ड लावावेत, अशी सूचना आरोग्य मंत्र्यांनी केली आहे.
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 50 खाटाचे रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत बोलत होते. सावंत म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात सध्या तरुणाई नैराश्याकडे जाताना दिसत आहे. युपीएससी, एमपीएसी स्पर्धा परीक्षा अपयश, शिक्षण, व्यवसाय यात अपयश आले की तरुणाईला एकच तोडगा दिसतो, तो म्हणजे परमिट रूम व बिअर बार. म्हणून मी आरोग्य विभागाला आवाहन करतो की, आरोग्य विभागाने ज्या ज्या ठिकाणी परमिट रूम आणि बिअर बार आहेत त्या ठिकाणी ‘आरोग्य तरुणांईचे, वैभव महाराष्ट्राचे’ असे बोर्ड लावावेत असे सांगत आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी नवीन संकल्पना मांडली.