नांदेड : वर्गातच विद्यार्थ्यांसमोर दारू प्यायल्यानंतर आणि ग्रामस्थांनी हा प्रकार उघड केल्यानंतर बदनामीच्या भीतीने एका मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यामधील लिंबोटी गावात सदर घटना घडली. जी. जी. गायकवाड असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकांचे नाव आहे.
लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जी.जी. गायकवाड हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. बुधवारी (दि. १८) सकाळी मुख्याध्यापक शाळेत आले आणि त्यांनी वर्गातच विद्यार्थ्यांसमोरच दारू घेतली. हा सर्व प्रकार पाहून विद्यार्थी शाळेबाहेर आले. त्यानंतर एका ग्रामस्थाने विद्यार्थ्यांना याबद्दल विचारले असता हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकारची माहिती मिळताच गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तीन शिक्षकांना चौकशीसाठी शाळेत पाठवले. त्यावेळी मुख्याध्यापक जी. जी. गायकवाड हे दारूच्या नशेत आढळून आले. त्यावेळी गायकवाड यांना नीट बोलताही येत नव्हते. तसेच एका ग्रामस्थाने त्याच्या मोबाईलमध्ये गायकवाड यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला.
संध्याकाळी मुख्याध्यापक गायकवाड माळाकोळी येथील आपल्या घरी परत आले. त्यानंतर घरातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आले. बदनामी होईल, या भीतीने गायकवाड यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी माळाकोळी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.