छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील चिश्तिया कॉलनी परिसरात पतीला कारागृहातून जामिनावर सोडवून आणण्याचे आश्वासन देत एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आरोपीने महिलेच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेत तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. तसेच, पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे पती सध्या हर्सुल मध्यवर्ती कारागृहात आहेत. त्यांना जामिनावर बाहेर काढून आणण्याचे आमिष दाखवत आरोपीने १६ मे २०२६ ते ७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महिलेशी संपर्क साधला. चिश्तिया कॉलनीतील राहत्या घरी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पतीची कारागृहातून सुटका करून देण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी आरोपीने केल्याचा आरोप आहे.

महिलेने या मागणीला नकार दिल्यानंतर आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास किंवा पोलिसांत तक्रार दाखल केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

आरोपीच्या कथित त्रासाला कंटाळून अखेर महिलेने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ६४, ६४(१), ३५२, ११५(२) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक नरळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे.







