छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आली आहे. नेते प्रचाराला लागले आहे. प्रचार सभा पार पडत असून बैठंकांचा सपाटा लावला आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक बातमी समोर आली आहे. पैठण मतदार संघातील महायुतीचे उमेदवार विलास भुमरे हे आज पहाटे पाचोड येथील राहत्या घरी भोवळ आल्याने कोसळले. त्यामुळे विलास भुमरे यांना चार ठिकाणी फॅक्चर झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. भुमरे यांच्यावरती सध्या छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून विलास भुमरे यांच्यावर थोड्याच वेळात शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघातून गेल्या पंधरा दिवसापासून ते प्रचार करत आहेत. ते पैठणमध्ये महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आज पहाटे भोवळ आल्यामुळे भुमरे कोसळले. ऐन विधानसभा निवडणुकीत दुखापतीमुळे विलास भुमरे यांच्यावर प्रचार बंद करण्याची वेळ आली आहे. विलास भुमरे यांचे पुढील प्रचाराचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले आहेत.
कोण आहेत विलास भुमरे?
विलास भुमरे हे खासदार संदिपान भुमरे यांचे पुत्र आहेत. विलास भूमरे यांनी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती म्हणून काम पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीत संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून विजय मिळवला. संदीपान भुमरे दिल्लीच्या राजकारणात गेल्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघातून विलास भुमरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. पैठण मतदारसंघात विलास भुमरे यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांच्यासोबत आहे. सभा अन् गावभेटी करत त्यांनी जोरात प्रचार सुरु केला होता. पण ऐन मोक्याच्या क्षणी त्यांना दुखापत झाली आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार थांबला आहे.