लातूर : चिंचोली महादेव (ता. जि. हिंगोली) येथून नीट परीक्षेसाठी लातुरात आलेल्या विद्यार्थिनीस रविवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता नांदेड रोडवरील एमडीए शिक्षण व संशोधन संस्थेच्या केंद्रावर पोहोचल्यानंतर अचानक चक्कर आल्याने तिला परीक्षा देता आली नाही. ऋतूजा बालाजी गुंडरे ही विद्यार्थिनी रविवारी सकाळी ११ वाजता नांदेड रोडवरील एमडीए शिक्षण व संशोधन संस्थेवर पोहोचली. या नीट परीक्षा केंद्रावर ५०४ पैकी ४९७ विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांची बायोमॅट्रिक हजेरी व नोंदणी सुरू असताना ऋतूजा गुंडरेला अचानक चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. तिचे हातपाय वाकडे झाले.
परीक्षा केंद्रावरील प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्याची सोय केली. घडलेली घटना नीट परीक्षा समन्वयकांसह नवी दिल्लीस्थित नॅशनल टेस्टिंग एजन्सीला कळविली. दरम्यान, तिची बायोमॅट्रिक हजेरी, नोंदणी चक्कर आल्याने होऊ शकली नाही.