Gautami Patil : लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा हुल्लडबाजी करत तरुणांनी राडा घातला. यावेळी कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या एका तरूणाच्या डोक्यात दगड लागल्याने तरूण गंभीर जखमी झाला आहे. तसेच संतप्त तरुणांनी नेत्यांचे बॅनर देखील फाडले. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी करणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि भाजपा नेत्यांनी हजेरी लावली होती.
उदगीर येथील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती. कार्यक्रम स्थळी नेत्यांचे मोठे मोठे बॅनर लावण्यात आले होते. गौतमीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तरुणांनी मोठी गर्दी केली. कार्यक्रम चालू असताना बेधुंद तरुणांनी तुफान राडा केला. मागे बसलेल्या प्रेक्षकाना कार्यक्रम दिसत नसल्यामुळे मागून मारलेल्या दगडात एक तरुण जबर जखमी झाला आहे.
जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. औषध उपचारानंतर तरुणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तसेच कार्यक्रम व्यवस्थित पाहता यावा यासाठी तरुणांनी नेत्यांचे बॅनर फाडून टॉवरवर उभं राहून कार्यक्रम पाहण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमात भाजप नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उदगीर आणि आसपासच्या परिसरातून आलेल्या प्रेक्षकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. काही तरुणांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.