छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खून, खुनाचा प्रयत्न तसेच जबरी चोरीसह दुखापत करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, जबर दुखापत करणे आदी गुन्ह्यांमधील कुख्यात आरोपी अजय राजू दहातोंडे (२३, रा. शिवाजीनगर, वडगाव कोल्हाटी) याच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी त्याला एमपीडीएखाली हुर्सल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तानी पारित केले आहेत.
अजय दहातोंडे याच्या वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी २०२३ मध्ये त्याच्या विरोधात एमपीडीएखाली स्थानबद्धतेची कारवाई आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ११० (ई) (ग) अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, इच्छापूर्वक दुखापत करणे, नुकसान करण्याच्या उद्देशाने स्फोटक पदार्थाद्वारे आगळीक करणे, दंगा करणे, घातक शस्र बाळगणे, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करण्याचे काम करत होता. त्याच्या गुन्ह्याचा आलेख चढता असल्याने त्याला हर्सूल कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संदीप गुरमे, एमआयडीसी वाळूज ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक द्वारकादास भांगे, हवालदार शेख नवाब, बाळासाहेब आंधळे, मंजित जाधव, दिपाली सोनवणे आणि महादेव दाणे आदींनी केली आहे.