छत्रपती संभाजीनगर : राज्यात आता लोकसभा निवडणूकीनंतर आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच आता महायुतीतच आमदारांची पळवापळवी सुरु झाल्याचं चित्र दिसून येत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता कन्नडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत बघायला मिळू शकते.
आता आगामीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठला आमदार कुठल्या पक्षात जाणार? कोणत्या पक्षाचं बलाबल वाढणार किंवा कमी होणार? याची उत्सुकता सर्वत्र दिसू लागली असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतच पळवापळवी झाल्याचं समोर आलं आहे. कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आज प्रवेश केला आहे. मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे महायुतीत सर्व आलबेल आहे कि नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.
विधानसभा लढत होणार चुरशीची?
माजी आमदार नितीन पाटलांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यापूर्वीच त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा लढण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाने छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे गटाचे कन्नड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत वर्चस्व असल्याचे सांगण्यात येत असताना नितिन पाटील यांच्या अजित पवार गटातील प्रवेशामुळे विधानसभेत शिवसेना विरुध्द शिवसेना नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात लढत होण्याचे संकेत दिसत आहेत.
तिहेरी लढत होण्याचे संकेत..
कन्नड विधानसभा निवडणूकीत २०१९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते हर्षवर्धन जाधव तर उद्धव ठाकरे गटाकडून उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिंदे गटाकडून नितिन पाटील हे संभावित उमेदवार समजले जात असताना त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने कन्नडची जागा आता महायुतीत शिंदे गटातून अजित पवार गटात जाईल चर्चा होत आहे. दरम्यान, विधानसभेत हर्षवर्धन जाधव विरुध्द उदयसिंह राजपूर विरुद्ध नितीन पाटील अशी तिहेरी लढत होण्याचे चिन्हे सद्या दिसत आहेत.