नांदेड : राज्यात लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, त्या उलट मात्र महाविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यानंतर भाजपला गळती लागलेली दिसून आली असून आता माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी ४ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर भाजप पक्षांतील मोठ्या व ज्येष्ठ नेत्यांची अस्वस्थता बाहेर येत असल्याचे दिसून येत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड जिल्ह्यातील भाजपमधील मोठं नाव असलेल्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्यासोबत २०१४ साली राष्ट्रवादीला सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा ते भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजपमधून उमेदवारीची अपेक्षा असताना…
काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर त्यांचे राजकीय विरोधक असलेले माधवराव किन्हाळकर नाराज असल्याचे सांगितले जात होते. दुसरीकडे भाजपमधून उमेदवारीची अपेक्षा असताना किन्हाळकरांना संधी न देत दहा वर्ष अडगळीत ठेवल्याच्या भावनेतून त्यांनी ९ जुलैला भाजपला सोडचिठ्ठी दिली. भाजपमधून बाहेर पडल्यापासून माधवराव किन्हाळकर राष्ट्रवादीत वापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात होती. यावर आता पूर्णविराम लागला आहे. आज (20 जुलै) संध्याकाळी ते शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा..
भाजपमध्ये प्रवेश करून १० वर्षे काम केल्यानंतरही माधवराव किन्हाळकर यांना संधी न मिळाल्याने त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला होता. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपला मराठवाड्यात पुन्हा एकदा गळती लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजपने शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर अजित पवारांसह राष्ट्रवादीलाही सोबत घेतले होते. त्यामुळे, भाजपमधील काही नेते नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. नांदेड जिल्ह्यात गेल्या महिनाभरात झालेल्या दोन नेत्यांच्या राजानाम्यामुळे भाजपला मराठवाड्यात मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झालं आहे. आता माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी आज भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माधव किन्हाळकर यांच्याकडे भोकर मतदारसंघाची जबाबदारी होती, त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे.