जालना : पोस्टाच्या पार्सलद्वारे मागितलेल्या १५ हजार रुपये किमतीच्या पाच तलवारी शुक्रवारी (दि.९) पोलिसांनी जप्त केल्या. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मागील आठवड्यात जालन्यात २२ तलवारी पकडण्यात आल्या होत्या, यानंतर आता ही दुसरी घटना आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांची माहिती घेत असताना जालना शहरातील संशयित मयूर नंदकिशोर मेंढरे (वय २ १, रा. खडकपुरारा. जालना) याने पोस्टाच्या पार्सल सेवेच्या माध्यमातून पाच तलवारी मागितल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पथकाने गुन्हे शाखेच्या पथकाने नंदकिशोर मेंढरे याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. तलवारींबाबत अधिक चौकशी केली असता १९ जुलै रोजी मुख्य पोस्ट कार्यालयातून तलवारींचे पार्सल मित्र संशयित अविनाश सुरज चौधरी (वय २६, रा. खडकपुरा, बरवारगल्ली) याच्या मदतीने घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने अविनाश चौधरी यालाही ताब्यात घेतले. संशयितांकडून पाच तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, उपनिरीक्षक योगेश उबाळे, शांतिलाल चव्हाण, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, रमेश राठोड, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, रामप्रसाद पव्हरे, सुधीर वाघमारे, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, आक्रुर घले, दत्ता वाघुंडे, संदीप चिंचोले यांनी ही कारवाई केली.