पूर्णा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे सोमवारी (दि.२९) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एकाने हवेत गोळीबार केला असून याप्रकरणी सदर युवकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला गजाआड करण्यात आले आहे.
आंबेडकरनगर परिसरात मागील काही दिवसांपासून वर्चस्व वाढविण्यासाठी अनेकांनी विनापरवाना शस्त्र बाळगले असून त्या शस्त्र बाळगण्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. यामध्ये सोमवारी (दि.२९) सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास आरोपी गौरव उर्फ सोनू कैलास खंदारे (रा. आंबेडकरनगर, पूर्णा) यांनी विनापरवाना आपल्या गावठी कट्ट्यामधून हवेमध्ये दोन फैरी झाडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये हजर केले. याप्रकरणी फिर्यादी सचिन संजय मगरे (रा.आंबेडकर नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गौरव उर्फ सोनू कैलास खंदारे याच्याविरुद्ध कलम ३०७ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.