छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे एका प्लास्टिकच्या दुकानाला भीषण आग लागली आहे. ही घटना शनिवारी (दि.09) मध्यरात्री घडली आहे. या घटनेत तीन जण जळून ठार झाले तर दोघे जण गंभीर जखमी झाले.
या घटनेत नितीन नागरे (वय 25 वर्षे), गजानन वाघ (वय 30 वर्षे), दुकान मालक सलीम शेख वय (25 वर्षे) या तिघांचा मृत्यू झाला आहे. तर शाहरुख सलीम पटेल व अजय सुभाष नागरे हे दोघे जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फुलंब्री शहरातील दरी फाटा येथे एका प्लास्टिकच्या दुकानाला शनिवारी रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती दुकान मालकाला मिळतात त्याने घटनास्थळी धाव घेतली. याचवेळी काही स्थानिक तरुण देखील त्या ठिकाणी पोहोचले. दुकानात प्लॅस्टिक असल्याने आगीने उग्र रूप धारण केल्यामुळे दुकानात मोठ्या प्रमाणात धुके व गॅस तयार झाला. त्यामुळे दुकान मालक सलीम शेख यांच्यासह काही तरुणांनी दुकानाचे शटर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक आगीच्या प्रेशरने स्फोट होऊन शटर जोरात बाहेर फेकले गेले. त्यामुळे शटर उघडण्यासाठी गेलेले तरूण शटरचे लोखंडी पार्ट लागून आणि आगीत होरपळून जखमी झाले. यातील तिघांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले. हे सर्व फुलंब्री येथील रहिवाशी होते.
दरम्यान, या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. तातडीने अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले व आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आता पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा केला जात असल्याची माहिती मिळत आहे.