छत्रपती संभाजीनगर: मयताचे नाव बदलून विमा कंपनीची तब्बल २५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन आरोपींवर दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एक महिला आरोपी तसेच सुनील वसंतराव बोडके (वय ४५ रा. वडगाव कोल्हाटी), अनिल वसंतराव बोडखे (वय ५५ रा. खेडी ता. खुलताबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी बजाज अलायन्स इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी राहुल श्रीकृष्ण सरडे (रा. सुतगिरणी चौक गारखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी महिलेचे पती चंद्रकांत वसंतराव बोडके हे इंडियन टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये सुनील वसंतराव बोडके या नावाने नोकरी करीत होते. १८ सप्टेंबर २०२१ रोजी धुळे-सोलापूर हायवेवरील माळीवाड्याजवळ त्यांचा अपघातात झाला. ते अपघातात मयत झाले. कंपनीतून विमा व इतर फायद्यासाठी आरोपींनी कट रचून मयताचे नाव चंद्रकांत वसंतराव बोडके असताना मृताचा पंचनामा व इतर कागदपत्रांमध्ये पोलिसांना सुनील उर्फ चंद्रकांत वसंतराव बोडके असे सांगितले. त्याच नावाचे खोटे शपथपत्र करून विम्याची २५ लाख रुपयाची रक्कम हडप केली. त्याचबरोबर विमाच्या रकमेसाठी मोटार वाहन प्राधिकरण न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा केला. सदर बनाव उघड आल्यानंतर कंपनीने न्यायालयात धाव घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.